येवला (नाशिक)- कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात शेतकरी व विविध संघटना आंदोलन करत आहेत. येवल्यातील एरंडगाव येथे प्रहार शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने, केंद्र सरकारचा निषेध करत मुंडन करून श्राद्ध घालत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी मागणी करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत मुंडन हे आंदोलन करण्यात आले.
चार महिन्यापूर्वीच मोठा गाजावाजा करत कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळून निर्बंध मुक्त केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. आज देश आर्थिक संकटात आहे. केवळ शेतीमुळे देशाची अर्थव्यवस्था थोडी का होईना जिवंत आहे. देशाला आज मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज आहे. ते चलन मिळवून देणाऱ्या प्रमुख वस्तूमध्ये कांद्याचा समावेश आहे. असे असताना अचानक कुठलीही माहिती, कुणाशीही चर्चा न करता, अहवाल न मागवता केंद्र सरकारने मनमानी करत निर्यात बंदीचा निर्णय लादला आहे, असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.