नाशिक - पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील महिलांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टोल कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना चांगली वागणूक मिळत नसल्याची तक्रार अनेक जणांनी केली आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या घटना टोल प्लाझावर दिवसेंदिवस वाढत आहेत. संंबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि वाहनचालक महिला यांच्यामध्ये हा वाद झाला.
टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
31 मे च्या रात्री प्रवासी महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत टोल नाक्यावरून प्रवास करत असताना, टोल देण्यासाठी थांबली, तीने 100 रुपयांची नोट महिला टोल कर्मचाऱ्यांना दिली. पण ती नोट फाटलेली असल्याने, ही नोट बदलून द्या असं या कर्मचारी महिलेने सांगितलं. मात्र माझ्याकडे दुसरी नोट नाही हीच घ्या, म्हणून प्रवासी महिलेने हट्ट धरल्याने वादाला सुरुवात झाली. वादाच रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान प्रवाशी महिलेची चूक असल्याचे टोल नाका प्रशासनाचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांची चूक असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये मात्र टोल कर्मचारी महिला या प्रवासी महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. त्यांमुळे संबंधित दोन्ही महिला कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे, मात्र आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
हेही वाचा -... आणि तो युवक बॉम्ब घेऊन चक्क पोलीस ठाण्यात दाखल झाला, वाचा पुढे काय झालं