नाशिक -पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागातले किकवारी खुर्द हे एक छोटेसे गाव. या गावाने 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना'त भाग घेत शासनाच्या विविध उपक्रमातील अनेक पुरस्कार पटकावले. निर्मलग्राम, स्मार्ट व्हिलेज सारख्या विविध संकल्पना राबवून या गावाने आपला ‘आदर्श’पणा जपला. यावर्षी पडलेल्या दुष्काळाने किकवारी खुर्द गावावर पाणी टंचाईचे सावट पसरले. शासन यावर काहीतरी सोय करेल या अपेक्षेने मदतीची वाट बघून-बघून गावकरी थकले. शेवटी गावाला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ स्वत:च सरसावले. लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी पैसे गोळा केले आणि त्यातून गावात जलसंधारणाची कामे करून 'आदर्श' गावाचा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
किकवारी खुर्द गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने सध्या येथे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला, नदी,नाले, धरणे कोरडी पडली आहेत. या गावातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तसेच येथील तरुणांना रोजगार नसल्याने त्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होतो. यावर्षी शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने सध्या पाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे. तर अत्यल्प पावसामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. कृषी विभाग, वनविभाग व महाराष्ट्र शासन दुष्काळ निवारण्यासाठी काहीतरी उपयोजना करतील. शासनाने बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला, त्यावर शासन काहीतरी ठोस पाऊले उचलेल, जलसंधारणेची कामे केली जातील याची वाट किकवारी ग्रामस्थांनी पाहिली. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेल आणि मग शासनाची जलसंधारणेच्या कामांची सुरुवात होईल, या अपेक्षेने ग्रामस्थ थांबले. परंतु, आचारसंहिता संपून बराच काळ लोटला. त्यामुळे ग्रामस्थांनी आता शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न ठेवता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढे सरसावण्याचे ठरवले. आदर्श ग्रामचे शिल्पकार सरपंच केदा बापू काकुळते यांनी त्वरित ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा केले.