नाशिक - देवळाली शिवारात टीडीआर घोटाळा झाल्याची दोन प्रकरणे समोर आली होती. यात पुन्हा एकदा खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यातील काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे आता समोर आल्याने नाशिक महानगरपालिकेतील शंभर कोटी रुपयांच्या वादग्रस्त टीडीआर घोटाळ्याची चर्चा पुन्हा जिल्हाभरात सुरू झाली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात नाशिक रस्ता देवळाली शिवारातील सर्वे नंबर 295 मधील शंभर कोटी रुपयांच्या टीडीआर संदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत शासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर नाशिक महानगरपालिकेला या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यासाठी तत्कालीन मनपा आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. चौकशी पूर्ण होऊन दोन महिने उलटल्यानंतर अॅड. शिवाजी सहाणे यांनी चौकशी समितीचे प्रमुख मनोज घोडे-पाटील यांना विचारणा केली. मात्र, यातील कागदपत्रे गहाळ झाल्याचे उत्तर आपल्याला देण्यात आल्याचा आरोप सहाणे यांनी केला आहे.