नाशिक Nashik Sex Racket News : नाशिकमध्ये छुप्या पद्धतीने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केलंय. मागील आठ महिन्यांमध्ये पाच ठिकाणी छापे टाकून 50 पीडित महिलांची सुटका करण्यात आलीय. यात 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सरकारवाडा पोलीस 5, मुंबई नाका पोलीस 4, अंबड पोलीस 2, उपनगर पोलीस 2 आणि पंचवटी पोलीस ठाण्याअंतर्गत 2, अशा एकूण 15 संशयितांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. शहरात कोठेही अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी पोलिसांच्या व्हाट्सअप क्रमांकावर माहिती कळवावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री : शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आठ महिन्यात पाच कारवाया करण्यात आल्यात. यात पीडित महिलांकडून बळजबरीने देहविक्रीचा व्यवसाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करून घेतला जात होता. संशयित व्यक्तींविरोधात तसंच व्यवसाय करून घेणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. काही ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय महिलांकडून करून घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस कारवाईमधून समोर आलीय.
देहविक्री करून घेणे अजामानपत्र गुन्हा :महिलांकडून देहविक्री करून घेणं, हा अजामीन पात्र गुन्हा आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानं महिला, युवतींना संरक्षण दिलंय. या कायद्यात शिक्षेची तरतूद सुमारे 5 ते 10 वर्षापर्यंतची सक्त मजुरी तसंच दंडाची शिक्षाही आहे. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार विविध कलमान्वये शिक्षेची तरतूद करण्यात आलीय, अशी माहिती वकिलांनी दिलीय.
पीडित महिलांचे समुपदेशन :समाजाला त्रास होईल अशा सर्वच विषयांवर कारवाईचं सत्र, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूय. त्यासाठी विशेष चार पथकांची नियुक्ती करण्यात आलीय. मागील आठ महिन्यांमध्ये पिटा कायद्याखाली देखील कारवाई करण्यात येऊन यामध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 15 जणांना अटक करण्यात आली होती. तसंच 50 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या पीडित महिलांना सुधारगृहात ठेऊन त्यांचं समुपदेशन करून भविष्य काळामध्ये पुन्हा या प्रवाहात येऊ नये, यासाठी मार्गदर्शन केलं जातं, असं सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी म्हटलंय.
लॉज व हॉटेलांमध्ये गैरकृत्ये :नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील लॉज व हॉटेलमध्ये अवैधरीत्या देहविक्री व्यवसायासह तरुण-तरुणींची गैरकृत्यं सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिल्यानं त्र्यंबकेश्वर पोलिसांनी लॉजचालकांना समजही दिली. मात्र राजरोसपणे सुरू असलेली ही गैरकृत्ये सुरूच आहेत. हे प्रकार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत. (sex racket in nashik)
5 किलोमीटर अंतरावर 60 लॉज :नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रभू हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी पर्वत भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर 60 हून अधिक विनापरवाना लॉज, हॉटेलमध्ये गैरकृत्ये सर्रास सुरू आहेत. या भागात खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांसह शाळा असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा नित्य वावर असतो. या रस्त्यावरच महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.