नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जूनवणेवाडी या आदिवासी वस्तीला जवळच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे सात महिन्यांची गरोदर असलेल्या वनिता भगत या महिलेला प्रसूती वेदना होत असताना रुग्णालयात जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरून अडीच किलोमीटर पायपीट करावी. त्यानंतर कुटुंबीयांनी झोळी करत रुग्णालय गाठले. मात्र या काळात वेदनांची तीव्रता असह्य झाल्यामुळे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव घरी नेण्यासाठीही झोळी करावी लागल्याने या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे
शासनाकडून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र इगतपुरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात विकासाच्या नावाखाली फक्त वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणांच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना बसत आहे. गावाला रस्ता नसल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा झोळी! -प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्याने असल्याने वनिता भगत या गरोदर महिलेला आपल्या नातेवाइकांसह चिखलातून अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यानंतर तिला झोळीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान प्रसूती वेदना आणि पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे या महिलेने दवाखान्यात पोहोचताच अखेरचा श्वास घेतला. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा चक्क झोळीचा वापर करावा लागला.
फक्त विकासाचे स्वप्न-करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना आहे. जूनवणेवाडी या गावात रस्ता करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यावधी रुपयांचे रस्ते करण्याऐवजी जूनवणेवाडी सारख्या अनेक गावात रस्ते नाहीत.