नाशिक - शहरातील नागरिकांना आता कोरोना लसीकरण करून घेण्याआधी रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी लागणार आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याना सूचना देखील केल्या आहेत. तर निधी अभावी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना थांबू नये म्हणून इतर विभागांचा निधी देखील आरोग्य विभागात वर्ग करण्याची तयारीदेखील मनपा प्रशासनाने आता दाखवली आहे.
लसीकरणासाठी नाशिककरांना करावी लागणार कोरोना टेस्ट
शहरातील नागरिकांना आता कोरोना लसीकरण करून घेण्याआधी रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी लागणार आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याना सूचना देखील केल्या आहेत.
..म्हणून गरज भासल्यास इतर विभागाचा निधी मनपा वळवणार -
नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याची वर्तवली जात आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट झाले असून या वाढत्या प्रादुर्भावामुळे आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. यातच शहरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू असून यात अनेकदा लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आता लसीकरण करून घेण्याआधी नाशिककरांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.
तर दुसरीकडे वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. यात निधीअभावी कोणत्याही कामात अडथळा येऊ नये म्हणून गरज पडल्यास इतर विभागांचा निधी आरोग्य विभागात वर्ग करण्याची तयारी मनपा आयुक्तांनी दर्शवली आहे.
प्रशासनाला नाशिककरांनी साथ देणे अत्यंत महत्वाचे - मनपा आयुक्त
नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढत होता मात्र संचारबंदी आणि मनपा प्रशासन करत असलेल्या विविध उपाय योजनांमुळे हा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला मात्र कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता मनपा प्रशासनाने सतर्कता बाळगत विविध उपाय योजनांना सुरुवात केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या नियमावलीला नागरिकांनी देखील साथ देणे तितकेच महत्त्वाचे आहे. तेव्हाच नाशिक शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश येणार आहे. यामुळे नाशिककरांनो नियम पाळा, प्रादुर्भाव टाळा असे आवाहन जिल्हा आणि मनपा प्रशासन यांनी केले आहे.