नाशिक - शहरातील वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नांगरे-पाटील यांनी धडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जानेवारी ते जुलैअखेर तब्बल १८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून ५० गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी धडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जानेवारी ते जुलैअखेर १८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर, ५० गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत. आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.
दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीचे अस्त्र डागले जात असल्याने बहुतांशी गुन्हेगारांनी शहरातून पलायन केले आहे. तर, टोळक्यात गुन्हे करणाऱ्या पाच टोळ्यांवरही कारवाईची कट्यार चालवण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांवर देखील करडी नजर ठेवली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.