नाशिक- ग्रामीण पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मंगळवारी मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलिसांचा यापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनामुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे होणारे मृत्यू चिंताजनक आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू - nashik police news
सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या कॉलेज रोड भागात राहणारे 51 वर्षीय पोलीस कर्मचारी हे काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील बंदोबस्तावरुन परतले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नाशिकच्या डॉ. वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने उपचारांदरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मालेगाव येथे बंदोबस्त करुन आलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला होता. या दुःखातून नाशिक ग्रामीण पोलीस सावरत नाही तोच आणखी एक धक्का बसला. नाशिक शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबधित रुग्ण-984 | नाशिक शहरातील कोरोनाबाधित रुग्ण-116 | नाशिक ग्रामीण भागातील बाधित रुग्ण-134 | मालेगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण-691 |
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या-54 | नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्ती-728 | नाशिक जिल्ह्यातील उपचार घेत असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण-204 |