नाशिक - सुवर्ण योजनेद्वारे आडगावकर सराफाकडून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. योजनेची मुदत संपल्यानंतर अनेक महिने उलटूनही गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेचे दागिने किंवा पैसेही परत मिळाले नाहीत. याप्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात आडगावकर सराफ पेढीचे संचालक महेश आडगावकर आणि गोकुळ आडगावकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मिरजकर सराफानंतर आडगावकर सराफ पेढीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सराफ पेढीकडून चालवण्यात येणाऱ्या सुवर्ण योजना किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील आडगावकर सराफ विरोधातात 31 गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. ‘सुवर्णसंधी' व ‘दूरदृष्टी' योजनेच्या नावाखाली आडगावकर सराफ पेढीने 17 लाख रुपये व सुमारे साडेसहाशे ग्रॅम सोन्याची फसवणूक केली आहे. प्रवीण दत्तात्रय जोशी (रा. पवननगर, सिडको) यांच्या तक्रारीवरून आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महेश राम आडगावकर व गोकुळ श्याम आडगावकर यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.
सराफ बाजार भागात असलेल्या आडगावकर सराफ पेढीने ग्राहकांचा चांगला विश्वास संपादन केला होता. काही वर्षांतच त्यांनी व्यवसायाचा विस्तार करीत शहरातील कॅनडा कॉर्नर, सिडको, नाशिक रोड आदी भागांत शाखांचा विस्तार केला. आडगावकर सराफ पेढीने सर्वच ठिकाणी भव्य शोरुम सुरू केले होते.