नाशिक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 2 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिकमध्ये हजर राहण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना दिली आहे. नारायण राणे हजर न राहिल्यास पुढची कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची रणनिती -
केंद्रीय मंत्र्याला अटक होत नाही असा केंद्रीय मंत्री नारायण यांसह भाजपाच्या नेत्यांचा गैरसमज महाराष्ट्र पोलिसांनी दूर केला आहे. यामागे दोन व्यक्ती आहेत. एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पडद्यामागून हे अशक्य असलेलं शक्य करून दाखवणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असभ्य भाषेचा वापर केल्यावर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे शिवसेनेला वाटतं होते. त्यावर सोमवारी रात्रभर चर्चा होत त्याला होकार मिळाला. मात्र कारवाई कोण करणार असा प्रश्न होता? राज्यातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांनी या विषयापासून लांब राहणेच पसंत केले. मात्र नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी यातील तरतुदींचा बारीक अभ्यास करून मार्ग काढला. कारवाईआधी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची तक्रार घेण्यात आली. शिवसेनेच्या अन्य मोठ्या नेत्यांचे जबाब नोंदविण्यात आले आणि नारायण राणे विरोधात भा.द. वि. कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कायद्यात राणेंच्या विधानाने समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकते तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.