नाशिक Salim Kutta : मुंबई 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याचा आणि नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा पार्टी व डान्स प्रकरणातील काही फोटो आणि व्हि़डिओ समोर आले आहेत. या प्रकरणी नाशिक पोलीस पुण्याच्या येरवडा कारागृहात जाऊन सलीम कुत्ताचा जबाब घेण्यास जाण्याची दाट शक्यता आहे. चौकशीमध्ये बडगुजर यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पोलिसांची ही पुढची भूमिका राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
काय आहे प्रकरण? :1993 सालच्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत आहे. तो पुण्याच्या येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी नाशिक शहराजवळच्या एका खेड्यालगतच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या रंगारंग पार्टीत 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा नाचत होता. त्याच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील नृत्य करताना दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबतचे आरोपही भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले होते.
बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू :याबाबत बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शहरात पार्टी नेमकी कशानिमित्त व कोणी आयोजित केली? हे अद्याप पोलिसांसमोर आलेलं नाही. बडगुजर काही प्रश्नांची उत्तरे देतात, तर काही उत्तरांसाठी पोलिसांकडे वेळ मागतात. यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. काही उत्तरे देतानाही त्यांनी सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असे समाधानकारक सहकार्य चौकशीत मिळत नसल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळं नाशिक पोलीस येरवडा कारागृह प्रशासनाकडे लवकरच पत्रव्यवहार करून या प्रकरणात गुन्हेगार सलीम कुत्ता याचा जबाब घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही. या सर्व शक्यता आहेत.