नाशिक - तिसर्या टप्प्यातील निर्बंध नाशिक जिल्ह्यात कायम राहणार असले, तरी शनिवार व रविवारी विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्न कार्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यानी सांगितले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
शनिवार व रविवारी विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्न कार्यास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत अटीशर्तीसह ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी रितसर पोलीस परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मात्र नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी भुजबळ यांनी दिला आहे. दरम्यान लग्नसोहळ्यासाठी निर्बंध शिथील केल्याने मंगल कार्यालय व लाॅन्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बहुतांश लग्नाच्या तिथी या विकेंडला
लग्नाच्या बहुतांश तिथी या विकेंडला आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय व लाॅन्स मालकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्नसोहळ्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी शनिवार व रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळ्याला परवानगी दिली.
...म्हणून नाशिकला तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्यात आले - भुजबळ