नाशिक - नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणी पुणे येथील ताईओ निप्पॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेडर्स या ऑक्सिजन पुरवठा कंपन्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कंपन्यांना २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ताईओ निप्पॉनला २२ लाख, तर जाधव ट्रेडर्सला २ लाख दंड
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरताना गळती झाली होती. यामुळे झालेल्या दुर्घटनेबाबत पुण्यातील ताईओ निप्पॉन व नाशिकच्या जाधव ट्रेडर्स या ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या सूचनेनुसार ताईओ निप्पॉनला २२ लाख, तर जाधव ट्रेडर्सला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नाशिकमधील घटना काय?
नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू असतानाच २१ एप्रिला 2021 रोजी महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये अचानकपणे ऑक्सिजन गळती झाली. यामुळे २४ रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने नाहक जीव गमवावा लागला. संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली होती. दरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. यानंतर यामध्ये ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात पुण्यातील ताईओ निप्पॉन या कंपनीला २२ लाख तर नाशिकच्या जाधव ट्रेडर्स या कंपनीला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तशी नोटीसही बजावण्यात आली आहे.
दुर्घटनेला कंपन्या जबाबदार
ऑक्सिजन प्लांटसारख्या महत्त्वाच्या बाबीकडे देखभाल करण्यासाठी संबंधित कंपनी ठेकेदाराने २४ तास तंत्रज्ञ हजर ठेवण्याचा करार करणे गरजेचे होते. याशिवाय दुर्घटना घडल्यानंतर अनेक तासांचा कालावधी उलटून देखील कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर झाले नव्हते. म्हणून ताईओ निप्पॉनला २२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर नाशिक मधील जाधव ट्रेडर्स या कंपनीला 19 ड्युरा सिलेंडर पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. पर्याय म्हणून ऑक्सिजनचे तीन सिलेंडर आणि तीन ड्युरा सिलेंडर रुग्णालयात ठेवणे करारानुसार बंधनकारक असताना देखील जाधव ट्रेडर्स कंपनीने सिलेंडर वेळेत न बदलल्याने ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही. यामुळे २४ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. तर या दोन्ही कंपन्यांच्या निष्काळजीपणा या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -ऑक्सिजनगळती दुर्घटनेची आर्थिक मदत घेऊन सून फरार; कारवाईची सासू-सासऱ्यांची मागणी
हेही वाचा -नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत