नाशिक - शहरातील नामांकीत खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाचा बाजार मांडला जातं असल्याचे वास्तव समोर आलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लाखो रुपये आकारणाऱ्या या हॉस्पिटलचा महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पर्दाफाश केला आहे. या हॉस्पिटलच्या विरोधात याआधी अनेक तक्रारी येऊनसुद्धा कानावर हात ठेवलेल्या महानगरपालिकेने अखेर अशा रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिक शहरात गेल्या 25 दिवसात कोरोनाबधितांचा आकडा एक हजारांनी वाढला आहे. अशात शासनाच्या हॉस्पिटलसोबत काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, त्याठिकाणी रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे समोर आलं आहे. काही दिवसांसाठी उपचारासाठी लाखो रुपये रुग्णांकडून वसूल केले जात आहेत.
अजय बोरस्ते, विरोध पक्षनेते नाशिक महानगरपालिका मुख्यमंत्र्यांना करण्यात आली तक्रार...
इंदिरानगर भागातील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्याचा दाखला शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी दिला होता. बिलाच्या नावाने लुटीचा पर्दाफाशही केला आहे. पंचवटीमधील मनोज लुंकड यांचे काका सुरेश लुंकड यांना न्यूमोनिया झाला म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांची तीन दिवसांनी कोरोना टेस्ट घेतली ती निगेटिव्ह आली. दहा दिवसांनी पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. या काळात रुग्ण मृत झाले. मात्र, हॉस्पिटलने 24 दिवसाचे बिल तब्बल 12 लाख आकारले. तसेच रोज 50 हजार रुपये भरण्याची सक्ती नातेवाइकांना करण्यात आल्याचा अनुभव लुंकड परिवाराला आला. असाच प्रकार सुभाष तिडके यांना आला आहे. त्यांच्याकडून 23 दिवसांचे बिल तब्बल 8 लाख रुपये वसूल कऱण्यात आले. याबाबत स्थानीक आरोग्य यंत्रणा कुठलाच न्याय देत नसल्याने या रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
आमदार सरोज आहिरे यांच्याकडून देखील अतिरिक्त बिल घेतले
देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना उपचारासाठी सहयाद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारानंतर हॉस्पिटलने त्यांना 60 हजार 227 रुपयांचे बिल दिले. मात्र, शासन नियमानुसार 49 हजारांचे बिल देणे अपेक्षीत असताना त्यांच्याकडून अतिरिक्त बिल वसूल केलं. याबाबत आहिरे यांनी महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलला महानगरपालिकेन नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या नावाने रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलविरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आहिरे यांनी सांगितलं.
प्रशासन आणि खासगी हॉस्पिटलचे षड्यंत्र असल्याची शक्यता?
नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शहरातील तिनही आमदार भाजपचे आहेत. अशात कोरोनाच्या नावाने शहरात नामांकित हॉस्पिटलकडून मोठी आर्थिक लूट होत असताना सत्ताधारी शांत का? या हॉस्पिटल विरोधात कारवाई का होत नाही. फक्त नोटीस देण्याचे सोपस्कार नको. आम्ही यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे.