नाशिक - मागील काही वर्षात नद्यांमध्ये गाळ वाढल्याने संकुचित झालेल्या पात्रामुळे नद्यांना पूर येण्याचे प्रमाण वाढत आहेत. महापालिकेने ( Nashik Municipal Corporation ) शहरातून जाणाऱ्या गोदावरीसह चार उपनद्या व 67 नैसर्गिक नाल्यांचे पात्र मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईतील मिठी नदीच्या पार्श्वभूमीवर ( Mitthi Pattern To Cleaning Godavari River ) आयआयटी या तांत्रिक संस्थेची मदत घेतली जाणार आहे. विशेष निधीतून या संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
नाशिक शहरातील उपनद्यांसह नाले पात्रात अतिक्रमणगेल्या काही वर्षात नाशिक शहरातील उपनद्यांसह नाले पात्रात अतिक्रमण वाढत चालले आहे. तसेच गाळ वाढत असल्याने नदीची पूरपातळी ( Godavari River Pollution ) वाढत आहे. ही बाब लक्षात घेत स्मार्ट सिटी कंपनीने काही महिन्यांपूर्वी गोदावरीतील गाळ काढण्याबरोबरच पात्र खोलीकरणाचे काम केले होते. गोदावरीप्रमाणे नंदिनी, वाघाडी आणि वालदेवी या उपनद्या तसेच 67 नाल्यांचे पात्र संकुचित झाले आहे. ही बाब लक्षात घेत पात्रांचा आकार मोठा करता येईल का? या दृष्टीने चाचणी सुरू आहे. त्या दृष्टीने महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी आयआयटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नद्या प्रदूषण मुक्त होणारमुंबईच्या मिठी नदीला 2008 मध्ये पूर आल्यानंतर तेथील महानगरपालिकेने नदी स्वच्छ करण्यासाठी आयआयटीच्या वतीने स्वछता कार्यक्रम हाती घेतला होता. तोच पॅटर्न आता गोदावरीसह उपनद्यांबाबत वापरला जाणार आहे. नमामी गोदा प्रकल्प तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या मार्फत सुरू असलेल्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत गोदावरी नदीचे सुशोभीकरण व प्रदूषण मुक्त केली जाणार आहे. 2027 ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्या अगोदर ही कामे होतील अशी आशा आहे.
महानगरपालिकेचे अपयशमुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर नाशकात गोदावरी नदीला मिळणाऱ्या चार उपनद्या व 67 नाले प्रदूषण मुक्त करण्यासाठी योजना आखली जाईल. त्यासाठी मुंबई आयआयटीचे अधिकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणारे आहे. लवकरच नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागेल असे महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
गोदावरी प्रदूषितचगोदावरी नदी ही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी वर्षभर देशभरातून हजारो भाविक स्नान करण्यासाठी येत असतात. मात्र ही गोदावरी नदी गेल्या अनेक वर्षापासून दूषित प्रवाहित होत आहे. या नदीमध्ये शहरातील आजूबाजूच्या नाल्यांमधून दूषित पाणी मिसळत असल्याचे चित्र आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गोदावरी नदीच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे नदीत मिसळणारे दूषित पाणी रोखण्यात महानगरपालिकेला अद्याप यश आलेले नाही.