नाशिक :कोकणात मान्सून दाखल झाला असून, पुढील तीन दिवसात तो राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशात शहरातील धोकादायक वाडे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी वाडे ढासळल्याचे प्रकार घडले आहे, यात जिवीतहानीही झाली आहे. अशात वाडे खाली करण्याबाबत महानगरपालिकेने संबंधितांना नोटिसा वाजवल्या होत्या, त्याचबरोबर वेळेत वाडे खाली न केल्यास संबंधितांचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा इशारा दिला होता. परंतु वाडे धारकांनी महानगरपालिकेच्या या नोटिसांना अजिबात थारा दिला नाही. आश्चर्य म्हणजे महानगरपालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने धोकादायक वाड्यांच्या प्रश्न गंभीर बनला आहे.
घरमालक सहकार्य करत नाही: नाशिक शहरातील सुमारे 1192 धोकादायक वाडे, घरे, इमारतीची यादी तयार करून संबंधित जागा व घर मालकांना नोटिसा बजावून संभाव्य धोक्याबाबत अवगत करण्यासाठी नोटिसा काढल्या. सहाही विभागीय अधिकाऱ्यांमार्फत या नोटिसा घर मालकांना बजावून त्यांना घर रिकामी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली. मात्र अनेक घरमालकानी या नोटीसा घेण्यास नकार दिला, तर काहींनी न्यायालयीन वादाचे कारण देत नोटीसा मिळाल्यावर स्वाक्षरी करण्यास विरोध दर्शवला.