नाशिक -शहरात शुक्रवारी दिवसभरात 20 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, जिल्हा आरोग्य प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयितांचे स्वॅब अहवाल आरोग्य विभागाकडून अद्यापही पालिकेला मिळाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
कोणी कोरोनाबाधित आढळल्यास त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर सील करणे. तसेच त्या परिसराची स्वच्छता करून रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करणे, हे काम महापालिकेला करावे लागत आहे. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून आरोग्य प्रशासनाकडून अद्यापही संशयित रुग्णांचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला नाही. त्यामुळे पालिकेने पुढील उपाययोजना कशा कराव्यात? असा प्रश्न आयुक्तांना पडला आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अनेकजण प्रतिबंधित क्षेत्रातून शहरात फिरत असल्याने महापालिका प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे नाशिक मनपा आयुक्तांनी पोलिसांना सूचना करत कारवाईची मागणी केली आहे.