नाशिक -येस बँकेत नाशिक महानगरपालिकेचे अडकलेले 311 कोटी रुपये आरटीजीएसद्वारे महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली. पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी महानगरपालिका अधिकारी काही तास बँकेतच ठाण मांडून बसले होते.
येस बँकेत अडकलेले 311 कोटी नाशिक महानगरपालिकेला मिळाले 5 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले होते. त्यामुळे महानगरपालिकेची अडचण झाली होती. या बँकेत महानगरपालिकेचे 296 कोटी तर रिझर्व्ह बँकेचे 14 कोटी असे एकूण 311 कोटी रुपये अडकले होते. विशेष म्हणजे ऑडिटर फर्मने खासगी बँकेत रक्कम ठेऊ नये असे आदेश 2018 मध्ये दिले होते तरी देखील खासगी बँकेत हे खाते कायम ठेवण्यात आले होते.
हेही वाचा -उद्योगांना आर्थिक पॅकेज मिळण्याची शक्यता; पंतप्रधानांकडून टास्क फोर्सची घोषणा
स्मार्ट सिटी कंपनीने 435 कोटी रुपयांपैकी 14 कोटी रुपये शिल्लक येस बँकेत ठेवले आहेत. महानगरपालिकेची मात्र, तब्बल 22 खाती येस बँकेत आहेत. मागच्या वर्षी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुख्य लेखपालांना पत्र देऊन देखील त्यांनी ही रक्कम काढली नव्हती. त्यामुळे येस बँकेत रक्कम अडकताच आयुक्तांनी मुख्य लेखपालांसह सात जणांना कारणे दाखवा नोटीस काढली.
खासगी बँकेत महानगरपालिकेने पैसे ठेवू नये, असे आदेश असताना देखील पैसे का ठेवले? याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.