महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकचे महापौर पद भाजपकडे, गिरीश महाजन पुन्हा ठरले संकटमोचक - नाशिक लेटेस्ट न्यूज

नाशिकच्या महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राज्यातील राजकीय संदर्भाची किनार लागली होती. मात्र, नाशिक महापालिकेत भाजपचे महापौर विराजमान झाले आहेत.

नाशिकचे महापौर पद भाजपकडे

By

Published : Nov 22, 2019, 7:54 PM IST

नाशिक -राज्यातील विभिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेल्या महाविकासआघाडीला मात्र, नाशिक महानगरपालिकेत महापौर पद राखता आले नाही. महापालिकेतील सत्ता हातोहात गेल्याचा अनुभव आघाडीतील पक्षांनी घेतला आहे. नाशिक महापालिकेतील सत्ता समीकरणे बदलल्यामुळे या ठिकाणी भाजपचा महापौर झाला आहे. यावेळी गिरीश महाजनच भाजपसाठी संकटमोचक ठरले आहेत.

नाशिकचे महापौर पद भाजपकडे

नाशिकच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राज्यातील राजकीय संदर्भाची किनार लागली होती. भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनेही चंग बांधला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसेची मदत घेऊन मॅजिक फिगर गाठता येईल, असा भरवसा वाटल्याने सेनेनेही ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. बहुप्रतीक्षेनंतर सत्तेचा वाटेकरी होता येत असल्याने दोन्ही काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, मनसेलाही भाव आला होता. याच दरम्यान माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यातील असंतोषाची साथ लाभली. आठ ते दहा नगरसेवकांची रेडिमेड कुमक लाभल्याने आघाडीचे बळ वाढले. बदल होणार अशा थाटात गर्जना सुरू झाल्या, सहलीचे सोपस्कार ही पार पडले. मात्र, तळ्यात-मळ्यात भूमिका असलेल्या मनसेने पहिला अपशकुन केला. त्यामुळे पाचही नगरसेवक न्यूट्रल झाले. याच दरम्यान दोन्ही काँग्रेसचे हौसले बुलंद झाले होते, कुठलीही पुण्याई पाठीशी नसताना थेट महापौरपदासाठी स्वप्नरंजन झाले. आघाडीकडे पुरेसे संख्या बळ नसल्याने भाजपने त्याचा लाभ उठवला. यासाठी पुन्हा संकटमोचक गिरीश महाजन उभे ठाकले.

जुने शिष्य अर्थात माजी आमदार बाळासाहेब सानप यांची गुफ्तगू झाल्यानंतर, सानपही आघाडीतून सोयीस्कर बाजूला झाले. यामुळे संभाव्य फुटीर नगरसेवकांच्या फुग्यातील हवा महाजनांनी काढून घेत, त्याच दरम्यान पक्षातूनही सतीश कुलकर्णी या ज्येष्ठ सदस्याला महापौर पदाची उमेदवारी देऊन निष्ठावंताचाही आवाज महाजनांनी बंद केला. गेल्या सत्तेच्या स्पर्धेत पक्षातील इच्छुकांची बोळवण करण्यात आली आणि सतीश कुलकर्णी महापौर पदावर विराजमान झाले.

महापौर भाजपचा होणार हे निश्चित झाले होते, त्यामुळे निवडणुकीसाठी येत असताना नेतेमंडळींची देहबोली सर्व काही सांगून गेली. फक्त औपचारिक घोषणा बाकी होती. पराभव होणारच म्हणून सर्वांनीच अर्ज माघारी घेतले. त्यामुळे महापौर पदी सतीश कुलकर्णी आणि उपमहापौर पदी भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली.

दोन्ही काँग्रेसच्या उंचावलेल्या अपेक्षांमूळ त्यांची सत्तेची लालसा आघाडीसाठी मायनस पॉइंट ठरली. ज्यांच्यावर सारा भरोसा होता त्या बाळासाहेब सानपांनी हाय खाल्ल्याने आघाडीचे उरलेसुरले बळही संपुष्टात आले. या घडामोडीत सगळ्यांना पुन्हा सन्मान मिळणार असल्याचा शब्द भाजपच्या नेत्यांनी दिल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात होती.

ABOUT THE AUTHOR

...view details