नाशिक- शहरातील रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठीही रुग्णांचा नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घालून पुरवठा सुरळीत करावा, असे साकडे महापौर सतीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
कोरोनाग्रस्त नागरिकांना रेमेडीसिवीर औषध आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी महापौर सतीश कुलकर्णी आणि भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले.
आँक्सिजन पुरवठा संपल्यावर रुग्णांना दुसरीकडे हलवावे लागते...
नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आता रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबाबत महापौर कुलकर्णी, खासदार डाॅ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मांढरे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. शहरातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करून त्यांना निवेदन दिले. शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला असून रुग्णांना खाट मिळेनासे झाले असून ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने रुग्णालयांकडून नवे रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे. आँक्सिजन पुरवठा संपल्यावर रुग्णांना दुसरीकडे हलवावे लागत असून रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. रेमडेसिवीर औषधाबाबत हीच परिस्थिती पहायला मिळत आहे. रेमडेसिवीर मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना दर-दर भटकावे लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो. ते बघता जिल्हाप्रशासनाने आँक्सिजन व रेमडेसिवीर पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून आँक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठा योग्य केला जात नाही
रुग्णालयातून रुग्णांच्या नातेवाइकांना सांगण्यात येते की, ऑक्सिजन संपत आहे. रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा, अशा परिस्थितीमुळे आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. परंतु, त्यांनी सांगितले की आम्ही मागणी करतो तेवढा पुरवठा होत नाही. राज्य शासनाकडून ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठा योग्य केला जात नसल्याचा आरोप यावेळी महापौर कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान या निवेदनाची तत्काळ दाखल घेत जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्या अन्यथा नागरिकांमधील असंतोष वाढून प्रशासनाला असंतोषाला समोर जाव लागेल, असा सूचनावजा इशाराही यावेळी भाजपकडून देण्यात आला आहे. यामुळे याची दाखल घेत जिल्हा प्रशासन उपाययोजना करणार का हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.