नाशिक - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला संबोधित करत 22मार्चला संपूर्ण भारतात 'जनता कर्फ्यु' पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बहुतांशी ठिकाणी जमाव बंदी लागू केली आहे. याला सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकांनी पाठिंबा दिला आहे.
सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व संघटनांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22मार्चला औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सुमारे साडेतीन हजारांपेक्षा जास्त युनिट बंद ठेवण्यात येणार आहेत. यात 3 लाखांपेक्षा जास्त कामगारांना सुट्टी देण्याचा निर्णय या औद्योगिक संघटनांनी घेतला आहे.