नाशिक - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गबाधितांवर वेळेवर उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्ययंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यात बिटको रुग्णालयाचे नाव अग्रभागी आहे. भविष्यात सर्वच आजारांवर उपचार करणारे रुग्णालय म्हणजे बिटको रुग्णालय असेल तसेच या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पालकमंत्री भुजबळ यांनी आज (रविवारी) नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, मुंबई केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर नाशिक बिटको रुग्णालयामध्ये सर्व आजारांचे निदान होईल, अशा सुविधा निर्माण करण्यात येऊन सर्व आजारांवर एकाच छताखाली रुग्णांना उपचार कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. तसेच शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी हे रुग्णालय असल्याकारणाने येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी भविष्यात कोविड व्यतिरिक्त कायमस्वरूपी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध असणारे हे रुग्णालय असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच यात प्रामुख्याने शस्त्रक्रिया, आधुनिक पद्धतीने विविध वैद्यकीय तपासण्या करण्याचीही सुविधा उपलब्ध करून कोणीही रुग्ण उपचारांपासुन वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.