नाशिक :महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. आजनिवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सुरेश पवार (नाशिक) यांनी अपक्ष व नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी या दोन पक्षांतून अर्ज सादर केले आहे. अन्सारी रईस अहमद अब्दुल कादिर (धुळे) व सुभाष चिंधे (अहमदनगर) यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन बनसोडे (नाशिक) यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षातून, तर शुभांगी पाटील यांनी धुळे भारतीय जनता पक्षातून अर्ज सादर केला आहे. ईश्वर पाटील (धुळे) यांनी अपक्ष व आम आदमी पार्टी या पक्षातून दोन अर्ज सादर केले आहेत. सुभाष जंगले (श्रीरामपूर) यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.
राजकीय चर्चांना उधान :मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीर तांबे यांना कॉंग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. कॉंग्रेसचे ठरले भाजपच कधी ठरणार? अशी प्रश्न उपस्थित होत असतानाच निवडणूक बिनविरोध होते की काय? अशा राजकीय चर्चांना उधान आले आहे. आज डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केलेली आहे. गुरुवारी डॉ. तांबे हे आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याचे निश्चितही झाले आहे. असे चित्र असताना दुसरीकडे मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपने राज्यातील इतरत्र मतदारसंघांकरिता आपले उमेदवार जाहीर केलेले असताना नाशिकच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे पक्षातही अंतर्गत कुजबुजीला उधान आले आहे.