महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कलाग्राम आणि येवला शिवसृष्टीसाठी निधी द्या; माजी खासदार समीर भुजबळांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी - शिवसृष्टी प्रकल्प निधी समस्या

कलाग्राम आणि येवला शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

नाशिक
नाशिक

By

Published : Feb 17, 2021, 4:16 PM IST

नाशिक- कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी ८ कोटी निधी तर येवला शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली.

यावेळी समीर भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांना प्रकल्पाबाबत माहिती देऊन त्यांना निवेदन दिले. येवला शिवसृष्टीबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहराच्या लौकिकात व पर्यटनात भर पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पास, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत दिनांक १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये ४ कोटी इतक्या रक्कमेस मान्यता प्राप्त आहे. या निधीत शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. कामाचा व्याप, विस्तृत स्वरुप, सुशोभीकरणाच्या बाबी, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण विषयक अभ्यास, सुसाध्यतेची पडताळणी, संशोधनात्मक अभ्यास आदी बाबींचे स्वरुप पाहता यापूर्वी मान्यता प्राप्त ४ कोटी हा निधी अत्यंत तोकडा पडत आहे. या प्रकल्पांतर्गतच्या उर्वरित बाबींसाठी व शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अधिक रकमेची आवश्यकता असून जिल्हाधिकारी नाशिक यांनी तसा प्रस्ताव शासनास सादर केला असून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन पुरेशा निधी अभावी बंद

तसेच नाशिक कलाग्रामबाबत म्हटले आहे की, नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा यासाठी एम.टी.डी.सीकडून 'दिल्ली हाट'च्या धर्तीवर नाशिक शहरात गोवर्धन येथे सन २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन पुरेशा निधी अभावी बंद पडले आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचा उद्देश आहे. या बाजारपेठेत आदिवासी बांधवांनाही त्यांच्या कलेचे प्रदर्शन करता येईल तसेच त्यांच्या हस्तकलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटनामध्ये भरीव वाढ होणार असल्याचे म्हटले आहे.

अपूर्ण कामांसाठी एकरक्कमी ८ कोटी निधी गरजेचा

या प्रकल्पांतर्गत प्रशासकीय इमारत, वर्कशॉप इमारत, खाद्य पदार्थांसाठी गाळे व ९९ व्यापारी गाळ्यांचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, प्रवेशद्वार पुढील कुंपणभिंत अंतर्गत रस्ता, बाहयविद्युतीकरण, पाणीपुरवठा इ. कामे पुरेशा निधीअभावी अपूर्ण आहेत. या अपूर्ण कामांसाठी एकरक्कमी ८ कोटी इतका निधी उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात-लवकर कलाग्राम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details