नाशिक - गुडघा माझा दुखतोय सुने..! दुखतोय सुने..! मोकळया हवेत चालूया, फिरुया.., फिटनेसचे धडे गिरवुया... गिरवुया, आरोग्य सांभाळून कुटुंबही जपुया..! अशा विविध प्रकारच्या चालींवर नाशिकमध्ये महिलांनी अनोखा 'फिटनेस भोंडला' साजरा केला. आद्य नवरात्र वॉकथॉनच्या माध्यमातून फिटनेस भोंडला सह हेल्मेट वापरण्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
गंगापूर रोड येथील तुळजाभवानी मंदिरापासून आद्य नवरात्र वॉकथॉनला सुरुवात करण्यात आली. कुटुंबातील महिला सुदृढ राहिल्या तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सुदृढ राहतो, या वाक्याला अनुसरून वूमन वॉकथॉन घेण्यात आला. यात 300 पेक्षा अधिक महिला साडी, नऊवारी साडी, घागरा अशा पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. या वॉकथॉननंतर महिलांनी तुळजाभवानी मंदिर परिसरात फिटनेस भोंडला खेळत आरोग्याच्या गीतांवर ताल धरला. तसेच काही महिलांनी हेल्मेट घालून गरबा खेळत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेशही दिला.