नाशिक Nashik Fire Brigade:मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराचा विस्तार झपाट्यानं होत आहे. सध्या नाशिकची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम महापालिका करते. मात्र शहरातील अग्निशमन विभागाकडं केवळ 118 कर्मचारी आहेत. त्यामुळं नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मोठी आग लागल्यास कर्मचार्यांवर १२ तास किंवा त्याहून अधिक तास काम करण्याचा ताण येतो. अग्निशमन विभागात आणखी 299 पदे भरणे आवश्यक असताना ही भरती लालफितीत अडकली आहे.
अग्निशमन जवानाची गरज : नाशिक शहरात शिंगाडा तलाव, म्हसरूळ, नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी अशी सहा अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या 60 फायरमन, 30 लँडिंग फायरमनसह 28 ड्रायव्हर कार्यरत आहेत. त्यांच्यावर संपूर्ण नाशिक शहराची सुरक्षा अवलंबून आहे. नाशिक महापालिकेच्या पहिल्या आराखड्यात फायरमन संवर्गातील 299 पदे मंजूर झाली आहेत. सेवानिवृत्ती तसंच स्वेच्छानिवृत्तीमुळे चालक सोडून केवळ 90 अग्निशमन कर्मचारी कार्यरत आहेत. 272 पदे रिक्त असून चालक, वायरलेस ऑपरेटर, ड्युटी फायर ऑफिसर, सब ऑफिसर, स्टेशन ऑफिसर आदी पदंही रिक्त आहेत. शहरात 12 मजल्यांपेक्षा उंच इमारती बांधण्यात येत असून त्यानुसार अग्निशमन दलाची अधिक गरज भासणार आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्या :गेल्या 10 वर्षात नाशिकची लोकसंख्या वाढली. मात्र पण शासनानं अग्निशमन दलात कोणतीही भरती केली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. सध्या 90 कर्मचारी, वाहन चालक 30 अशी कर्मचारी संख्या आहे. अशात पुढील वर्षी 20 ते 22 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळं अजून कर्मचाऱ्यांचा ताण वाढणार आहे. 12 तासाहून अधिक काम करूनही अधिक मोबदला दिला जात नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.