नाशिकFarmer Suicide Nashik: चांगल्या भाव मिळेल या अपेक्षेनं कांद्याचे उत्पादन घेऊनही अपेक्षित भाव न मिळाल्यानं उत्पादन खर्चही भरून निघू शकला नाही. यामुळे मानसिक तणावात येऊन देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. अवघे दीड एकर क्षेत्र असूनही बँकही कर्ज देत नसल्यानं हताश होऊन त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
कर्ज फेडण्याची चिंता वाढली:नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथे राहणारे प्रताप बापू जाधव (वय 36) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. सातत्याने नापिकीशी सामना करणाऱ्या जाधव यांनी चार पैसे जमवून कांद्याचे उत्पादन घेतले. भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र तो पूर्णतः खराब झाला. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा या विवंचनेत असताना त्यांनी घरातील मंडळी झोपलेले असताना आत्महत्या केली. कुटुंबांनी त्यांचा शोधाशोध केली असता त्यांचे स्वेटर विहिरीजवळ आढळून आले.
130 कोटींची उलाढाल ठप्प:निर्यातशुल्क तातडीनं रद्द करावे, बाजार समितीतील मार्केट फी अर्धी करावी आदी मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी जिल्ह्याभरात कांदा लिलावावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात एकट्या लासलगावी 20 ते 30 कोटी तर जिल्ह्यात सुमारे 120 ते 130 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत कांदा लिलाव होणार नाही, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे आता राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार आहे. 26 सप्टेंबरला पणन मंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.