नाशिक Nashik Drug Case :ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ताब्यात घेतलेला पाटील याचा वाहन चालक सचिन वाघ याची चौकशी करण्यात आली. यावेळी सचिन वाघ याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेगोडा येथील गिरणा नदी पात्रात एम डी ड्रग्ज फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, काल रात्री पासून मुंबईसह नाशिक देवळा पोलीस नदी पात्रात ड्रग्जचा शोध घेत आहेत.
ड्रग्जची किंमत अंदाजे 100 कोटी : मुंबई पोलिसांनी नाशिकच्या शिंदे गावात असलेला ललित पाटील याचा एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त करत 300 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याच्या काही दिवसानंतर फरार असलेल्या ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आलं. पुढं या प्रकरणात ताब्यात घेतलेला ललित पाटील याचा वाहन चालक सचिन वाघ याच्या चौकशी दरम्यान त्याने देवळा येथील गिरणा नदीपात्रात एमडी ड्रग्ज फेकल्याचं सागितलं. यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमला रात्री दोन वाजेच्या दरम्यान नदीत ड्रग्जच्या गोण्या सापडल्या. त्यानंतर आज सकाळी देखील नदीत फेकण्यात आलेलं ड्रग्ज शोधण्याचं काम सुरू आहे. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ यानं ड्रग्ज नष्ट करण्याच्या उद्देशानं आतापर्यंत दोन गोण्या ड्रग्ज नदीपात्रात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान या ड्रग्जची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.