नाशिक : Nashik Drug Case : त्र्यंबकेश्वरजवळ मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांकडून स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. तसंच या विद्यार्थ्यांकडं ड्रग्ज असावं अशी शंका असल्यानं पोलिसांनी या भागात सर्च ऑपरेशन राबवलं. पोलिसांनी परदेशी विद्यार्थ्यांच्या घरांची तपासणी करून, त्यांची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडं पोलिसांना कुठल्याही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नाहीत.
कॉफी शॉप सील :मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा नाशिकमधील एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर नाशिक पोलीस एक्शन मोडवर आहेत. नाशिक पोलिसांनी ड्रग्जविरोधात धडक मोहीम राबवली असून, एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या 12 जणांना अटक केली आहे. तसंच शहरातील 9 कॉफी शॉपमध्ये युवक-युवती ड्रग्जचं सेवन करत असल्याच्या कारणानं कॉफी शॉपला सील करण्यात आलं आहे.
त्र्यंबकेश्वर महिरावणी भागात अनेक परदेशी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यात बहुतांशी आफ्रिकन विद्यार्थी आहेत. स्थानिक नागरिकांना त्यांच्याकडून त्रास होत होता. आम्ही या भागातील 35 परदेशी विद्यार्थ्यांची अचानकपणे घरझडती घेतली. मात्र, त्यात कुठलेही आक्षेपार्य वस्तू आढळून आल्या नाहीत. तसेच आम्ही हॉटेल आणि लॉजिंगची तपासणीसुद्धा केली आहे. अवैध व्यवसायाबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी 6262256363 या नाशिक ग्रामीण पोलीस हेल्पलाइन नंबरवर ती माहिती द्यावी, माहिती देणाऱयाचे नाव देखील विचारले जाणार नाही - बिपीन शेवाळे, पोलीस अधिकारी, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे
परदेशी विद्यार्थ्यांच्या घराची झडती :पोलिसांनी त्र्यंबकेश्वर रोडवरील लॉजिंगची तपासणी केली. अशात त्र्यंबकेश्वर भागामध्ये अनेक महाविद्यालय असून, या ठिकाणी परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात सर्वाधिक नायजेरियन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते राहत असलेल्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना त्यांच्याकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. तसंच ते ड्रग्जचं सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्र्यंबकेश्वर महिरावणी भागामध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या घरामध्ये जाऊन धडक तपासणी मोहीम राबवली. यावेळी 32 घरांची तपासणी करण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली. मात्र, यात कुठलेही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.