नाशिक - रुग्णालयांमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांची एका पथकाद्वारे तपासणी करून आवश्यकतेनूसारच इंजेक्शनचा वापर होतो की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव महापालिका आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत. इंजेक्शनचा दुरुपयोग होत असल्यास संबंधित रुग्णालयाविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे स्पष्ट आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. कोरोना उपचारात महत्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजारातून जिल्हाप्रशासनाने धडा घेत टोसिलिझुमॅब इंजेक्शनच्या बाबतीत असा प्रकार घडणार नाही, यासाठी पावले उचलली आहेत.
रेमडेसिवीरनंतर टोसिलिझुमॅब इंजेक्शनच्या मागणीत वाढ -
रेमडेसिवीरनंतर टोसिलिझुमॅब इंजेक्शनची मागणी वाढत आहे. रुग्णालयांमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर योग्य पध्दतीने होतो की नाही याची तपासणी करून घ्यावी. ज्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन देण्यात आले त्याचा वापर न झाल्यास सबंधित रुग्णालयांनी ते राखून ठेवावे. कोणत्याही परिस्थितीर त्याचा काळाबाजार होता कामा नये. इंजेक्शन परस्पर दुसर्यांना देऊ नये. तसेच इंजेक्शनच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयांनी जिल्हाप्रशासनाने दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात इंजेक्शनची माहिती भरावी व त्याबाबत फलकावर माहिती लिहावी. तसेच संगणीकृत एक्सेलशीटमध्ये माहिती भरावी. जेणेकरुन तपासणीसाठी अधिकारी आल्यास त्यांना तत्काळ ही माहिती सादर करता येईल, अशा सूचना जिल्हाधीकाऱ्यांनी दिल्या आहेत. इंजेक्शनच्या वापरात गैरप्रकार आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दोषी रुग्णालयांविरुध्द गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला आहे.
रुग्णालयांनी दैनंदिन वापराची माहिती सादर करावी -
कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींसाठी टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर करण्यात येईल त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाद्वारे दिलेल्या संगणकीकृत एक्सेल शीटमध्ये जतन करून त्याचा दररोज प्रिंट आऊट घेऊन बॉक्स फाईलमध्ये ठेवावी. त्यात काल अखेरचा शिल्लकसाठ्याची नोंद असावी. ज्यावेळी तपासणीसाठी अधिकारी येतील त्यावेळी हे रजिस्टर तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे. इंजेक्शन वापरासाठी रुग्णालयाला मिळाल्यानंतर त्याचा रुग्णासाठी वापर न झाल्यास सदर इंजेक्शन विहीत पद्धतीने जतन करून ठेवावे. सदर इंजेक्शन पूर्व परवानगी शिवाय इतर रुग्णाला किंवा रुग्णालयाला हस्तांतरीत करू नये. तसेच ज्या रुग्णालयातील रुग्णांना वरील इंजेक्शन देण्यात आले आहेत त्या रुग्णाचे नाव रुग्णालयातील फलकावर नमुद करावे. या सुचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास अथवा मंजूर केलेले इंजक्शन अन्यत्र आढळल्यास संबंधित सर्व व्यक्ती आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत फौजदारी कारवाईस पात्र ठरतील याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.