नाशिक- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचे भूत बसले आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नाशिकच्या द्वारका परिसरात जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय आहे. मात्र, हे कार्यालय ज्या जागेवर उभारण्यात आले आहे तिथे आधी कब्रस्तान असल्याने बँक डबघाईला आल्याचा जावई शोध संचालक मंडळांनी लावला असून ही बँक पुन्हा पूर्वीच्या सीबीएस येथील जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
बँकेवर असलेली भुतबाधा उतरवण्यासाठी बँकेचे मुख्यालय पुन्हा नव्या इमारतीतून सीबीएस जवळील इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. वैज्ञानिक युगात जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत अंधश्रद्धा पाळल्या जातात याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जुन्या इमारतीत असलेल्या तिजोरीची पूजा करण्यात आली असून टप्याटप्याने नवीन इमारतीतील सर्व विभाग जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेत येणे सोपे व्हावे यासाठी नाशिकच्या मध्यवर्ती भाग असलेल्या द्वारका परिसरात तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून देखणी इमारत बांधण्यात आली मात्र, आता अंधश्रद्धेपायी तब्बल पाच कोटी रुपयांवर पाणी सोडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे. जिल्हा बँकेचे जवळपास 2 हजार 700 कोटीचे कर्ज थकीत असून, कर्ज वसुली मात्र अवघी दहा टक्के झाली आहे. त्यामुळे दुष्काळात बँकेने कर्ज वसुलीचा तगादा सुरू केला आहे. या कर्जवसुलीवरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांच्याविरोधात भाजपचेच लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत. बँकेला सतत होणारा तोटा, बरखास्तीची कारवाई, संचालकांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, जिल्ह्यातील बँकेतील तिजोऱ्यांचे लुटण्याच्या घटना याचा संदर्भ हा बँक ज्या जागेवर आहे, तेथील भूतबाधेशी जोडला जात आहे. त्यामुळे बँक स्थलांतरित करण्याचा निर्णय संचालक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.