नाशिक- दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून नरहरी झिरवाळ यांचा झालेला एकतर्फी विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना-भाजप युतीच्या तालुक्यातील पदाधिकारी व नेते मंडळींच्या डोळ्यात घातलेले अंजन आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत असलेली गटबाजी मोठ्या प्रमाणात मताचे रुपांतरातून भास्कर गावित यांच्या पराभवाने समोर आल्याने दिंडोरी विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरला आहे. महत्वाचे म्हणजे नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या सामान्य माणसाने जनसंपर्काच्या जोरावार विजयी 'हॅट्ट्रिक' साधली आहे.
दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून धडा घेत अत्यंत नियोजनबद्धरीत्या प्रचार यंत्रणा राबवली. आमदार नरहरी झिरवाळ यांची वैयक्तिक प्रतिमा असलेल्या तालुक्यावर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचे तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेले वर्चस्व यामुळे शिवसेनेत निवडणुकीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
ही ठरली २०१९ निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये -
- विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली आहे
- दिंडोरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
- शिवसेनेचे उमेदवार असलेले भास्कर गावित यांना यांच्या पेठ तालुक्यातून शिवसेनेला अत्यल्प मतांची आघाडी
- नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणार्या उमेदवार नरहरी झिरवाळ ठरले आहेत
ही आहेत शिवसेनेचा उमेदवार पडण्याची कारणे -
- निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ
- शिवसेनेचे तालुका पदाधिकारी यांचे ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी नसलेला संवाद
- उमेदवारीवरून शिवसेनेत पडलेली गट
- निवडणुकीच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांना मिळालेली कमी रसद
- उमेदवार भास्कर गावित पेठ तालुक्यातील असल्याने दिंडोरी तालुक्यातील जनतेशी नसलेली ओळख
- सर्वाधिक मतदान असलेल्या दिंडोरी तालुक्यातील उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याने दिंडोरी पेठचा प्रांतवाद दिंडोरी तालुक्यातील मतदारांच्या मनात तयार झाला