नाशिक - पेठ रस्त्यावर आशेवाडी शिवारात दुचाकी कंटेनर अपघातात नाशिकरोड येथील दाम्पत्य ठार झाले आहे. या परिसरात खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असूनही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे.
जेलरोड, नाशिकरोड येथील अनिल मधुकर साळवे (वय 45), सरला अनिल साळवे (वय 40) हे दाम्पत्य नाळेगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. ते नाशिकला बुधवारी रात्री 8 च्या सुमारास दुचाकीवरून परतत असताना आशेवाडी शिवारात समोरुन येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. या भीषण अपघातात हे कुटुंबीय जागीच ठार झाले. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार धनंजय शिलावट, गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर व चालकास ताब्यात घेतले आहे. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर पुन्हा ती सुरळीत करण्यात आली.
दिंडोरी पोलीस ठाण्यात कंटेनर चालक कैलास अशोक पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, सहा. पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण,गायकवाड करत आहे.
नाशिक पेठ धरमपूर राष्ट्रीय महामार्गाचे मागील अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. सर्व रस्त्याचे काँक्रीटीकरण अद्याप सुरुच आहे. मात्र आशेवाडी व आंबेगण शिवारात डांबरीकरण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये दररोज अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या रस्त्याचे पुन्हा काँक्रीटीकरण व्हावे, अशी मागणी स्थानिकांनी केलीय.
नागरिकांनी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, आशेवाडी येथील अपघात रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला आहे, परंतु यावेळी वाहनधारकाने हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. याबाबत खड्डे बुजवण्याच्या मागणीचे लेखी पत्र पिंपळगावातील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी बांधकाम विभागास दिले आहे.