नाशिक - शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच रुग्ण मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. परिणामी येथील अमरधाम (स्मशानभूमी) येथील यंत्रणेवर ताण येत आहे. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारसाठी जागा नसल्याने नाईलाजाने जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या एकट्या पंचवटी भागात चोवीस तासात 80हून अधिक मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तर प्रशासन कोरोना मृत्यूचे आकडे लपवत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज 2 हजाराच्याच्या पुढे नवीन रुग्ण आढळत आहे. तर 15 ते 29 जणांचा मृत्यू होत आहे. येथील अमरधाममध्ये दिवसाला 8 ते 10 मृतदेह अंत्यसंस्कारसाठी येत होते. त्याची संख्या आज 35 ते 40वर पोहोचली आहे. त्यामुळे अमरधाम येथील कर्मचाऱ्यांनवर ताण वाढला आहे. पंचवटी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी 9 बेड आहे. मागील चोवीस तासात 40 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेहांची संख्या वाढत असल्याने नाईलाजाने जमिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 24 तास काम करावे लागत आहे.