नाशिक -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव वैयक्तिक पातळीवर साजरा करावा. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कावड घेऊन आलेल्या भाविकांनी जिथे असाल तेथूनच माघारी परतावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि प्रशासकीय नियोजन यांची माहिती माध्यमांना दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात जरी असली तरी तिचा उद्रेक कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा करावा. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी, नवरात्रोत्सवात भरणारी सप्तश्रृंगी देवीची यात्रा या वर्षी विश्वस्त, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून रद्द करण्यात आली आहे. गडावर कावड, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना यावर्षी गडावर येण्यास मनाई असल्याने त्यांनी येऊ नये. जर कोणी निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे. आपल्या गावी, घरी जाऊन देवकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.