नाशिक - कोरोना आणि अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीककर्ज वाटपासाठी सरकारने 437 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. हा निधी व पूर्वीचा उर्वरित निधी असे एकूण 443 कोटींचे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
खरिपाकरिता शेतकऱ्यांना 443 कोटींचे कर्जवाटप नाशिक जिल्ह्याला पीकर्जाच्या वाटपाचे दिलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे. जिल्ह्यातील 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांनी 443 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्ज वाटपाची एकूण टक्केवारी 101 टक्के इतकी झाल्याचे मांढरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपेक्षा 17 टक्के अधिक पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात प्रथमच कधी नव्हे तेवढे पीककर्ज वाटप झाले आहे. दरम्यान, आधीच कोरोना तसेच अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
गतवर्षीपेक्षा 17 टक्के अधिक पीककर्ज वितरण
गेल्यावर्षी 3 हजार 147 कोटी रुपयांचे खरीप व रबी पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यावेळी कर्ज वाटप 1 हजार 623 कोटी रुपये झाले होते. यंदा खरिप व रबीसाठी एकूण 3 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दीष्ट होते. तर कर्ज वितरण हे 2 हजार 271 कोटी इतके झाले आहे. वाढीव उद्दिष्ट असून व परिस्थिती प्रतिकूल असूनही गेल्यावर्षी पेक्षा 17 टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात एनडीसीसी बँक, बॅक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगल्या प्रकारे पीककर्ज वितरण केले आहे. तर एनडीसीसी, बँक ऑफ इंडिया व युनाटेड बँक ऑफ इंडियाने उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.