नाशिक- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून पॉझिटीव्ह रुग्णाच्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकित सांगितले.
नाशिककरांना वारंवार आवाहन करून देखील नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे कडक कारवाई करण्याच्या विचारात आहेत. जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन केंद्र प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांवर आता दंडात्मक कारवाई न करता संबंधित ठिकाण हे एक ते सहा महिन्यांसाठी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र कोरोना केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये देखील कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून जिल्हा रुग्णालय आणि बिटको रुग्णालयातील घशातील स्त्रावाच्या नमुन्यांच्या चाचण्या कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.