नाशिक - कोल्हापूर, सांगलीतील महापुरात आमच्या बहीण-भावांचे वह्या-पुस्तके वाहून गेली. त्यामुळे नाशकातील दोन चिमुकल्यांनी आपल्या पिगीबँकमध्ये साठवलेले पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे देत आमच्या पूरग्रस्त बहिणी-भावांना पुस्तके घेण्यासाठी द्या, अशी विनंती केली. रक्षाबंधनाला त्यांचे अनोखे प्रेम पाहायला मिळाले.
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त बहीण-भावांना पुस्तके द्या; चिमुकल्यांनी दिले पिगी बँकमधील पैसे - पूरग्रस्तांसाठी पिगीबँक
कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे पुस्तके, वह्या शाळेचे सर्वच साहित्य वाहून गेले. त्या पूरग्रस्त चिमुकल्यांचे हाल बघितले अन् नाशकातील दोन चिमुकले आपल्या पिगीबँकमधील पैसे घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

शहरातील सिडको भागातील चेतना नगर येथे देवरे कुटुंबीय राहते. याच कुटुंबातील तेजस्वी आणि शाहू या दोन चिमुकल्यांनी खाऊ आणि चॉकलेटसाठी पैसे साठवले होते. मात्र, माध्यमातून सातत्याने दाखवण्यात आलेले कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांचे हाल त्यांनी बघितले. त्यामुळे त्यांनी खाऊसाठी साठवलेले पिगीबँकमधील पैसे त्यांना देण्याची इच्छा वडील वैभव आणि आई सोनाली देवरे यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यांनी देखील होकार देत थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. दोन्ही चिमुकल्यांनी आपल्या पिगी बँकमधील पैसे जिल्ह्याधिकारी सुरेश मांढरे यांना दिले. तसेच दोन्ही पूरग्रस्त जिल्ह्यातील बहीण-भावांना पुस्तके घेण्यासाठी पाठवण्याची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांचं कौतुक केले.