नाशिक - फार्मास्युटिकल कंपनीला आवश्यक असलेले कच्चे तेल भारतातून नेदरलँडस् येथे पाठविण्याच्या मोबदल्यात मोठे कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील व्यापाऱ्यास तब्बल १९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी दिल्लीस्थित नायजेरियन तरुणासह अन्य एकास बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाइन फसवणूक
ऑनलाइन डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.असाच आणखी एक प्रकार नाशिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. टुली मॅडली या डेटिंग अॅपवरून महिला असल्याचे भासवत सायबर चोरट्याने नाशिकच्या एका व्यापाऱ्याशी मैत्री केली. मोनिका सिंग असे या कथित महिलेचे नाव होते. तिने आपण नेदरलँडस् येथील अॅमस्टरडॅम याठिकाणी राहायला असून याठिकाणी असलेल्या बोरटॅड फार्मास्युटिकल नावाच्या कंपनीमध्ये असिस्टंट प्रोडक्शन अॅनालिस्ट असल्याचे सांगितले. व्यापाऱ्याचा विश्वास संपादित केल्यानंतर या कथित महिलेने आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी रॉ मटेरियलची गरज असल्याने सुरवातीला तिने शहरातील व्यापाऱ्याकडून सहा लिटर ऑइल कुरियरद्वारे मागवले. त्यानंतर पुन्हा मोनिकाने २०० लिटर ऑईलची मागणी केली. यावेळी तिने कमिशनचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरायला सांगितले. यात तिने व्यापाऱ्याला १९ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला होता.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यापाऱ्याने सायबर पोलिसांत धाव घेत प्रकरणाची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर दिल्लीला पथक रवाना करून दिल्लीमध्ये सापळा रचत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एक जण हा नायजेरियन असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.