नाशिक -पाडवा आणि भाऊबीजच्या निमित्ताने आज गावी जाण्यासाठी नागरिकांनी नाशिकच्या बसस्थानकावर मोठी गर्दी केली होती. यामुळे कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
अधिक माहिती देताना कपिल भास्कर.... नाशिकमध्ये नागरिकांनी पाडवा आणि भाऊबीजच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी एसटीच्या प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या प्रमुख ठक्कर बाजार बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. काल (रविवार) 15 ऑक्टोबर रोजी एका दिवसात नाशिकच्या एसटी महामंडळाला 19 लाखांचे उत्पन्न मिळाले. तर आज देखील सकाळपासून धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी बसस्थानकात गर्दी केली होती. प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता नाशिक एसटी महामंडळाने 100 हून अधिक बसची व्यवस्था केली होती.
कोरोनामुळे विशेष खबरदारी
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला करोडो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र अनलॉकनंतर पुन्हा एकदा एसटी रस्त्यावर आली आहे. प्रवाशी देखील सुरक्षित प्रवास म्हणून गावाला जाण्यासाठी एसटीच्या प्रवासाला प्रधान्य देत आहेत. अशात कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता एसटी महामंडळाने विशेष खबरदारी घेतली आहे. एसटी निघण्यापूर्वी एसटीमधील सर्व सीट्स सॅनिटाइज केले जात आहेत. तसेच एसटीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी भाडे वाढ नाही
उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळी काळात अनेकदा एसटीकडून भाडेवाढ केली जात असते. मात्र यंदा एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
खानदेशात जाण्यासाठी जादा बसेस
नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव आदी खान्देशी भागातील नागरिक कामानिमित्त नाशिक शहरात स्थानिक झाले आहेत. अशात दिवाळी निमित्त दरवर्षी हजारो नागरिक गावाला जात असतात. एसटीचा प्रवास सुरक्षित आणि कमी खर्चात असल्याने अनेक प्रवासी कुटूंबा समवेत एसटी बसने प्रवास करत असतात. तसेच अनेक महिला लक्ष्मीपूजन सण साजरा केल्यानंतर भाऊबीजला माहेरी जाण्यासाठी एसटीच्या प्रवासाला अधिक पसंती देत आहेत. यामुळे एसटी महामंडळाने जादा बसचे नियोजन केले आहे.
बस स्थानकावर भाऊबीज साजरी
कोरोना काळात कोरोना योद्धे म्हणून आपले कर्तव्य बजावणाऱ्या एसटी महामंडळातील चालक, वाहन यांचे एसटीतीलचं महिला कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात औक्षण करून भाऊबीज साजरी केली. घरापासून लांब असलेले वाहन-चालक यावेळी भावुक झाले होते.
हेही वाचा -खाकी वर्दीचा कौटुंबिक जिव्हाळा; हुतात्मा कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना अधीक्षकांकडून दिवाळी भेट
हेही वाचा -नाशकात भेसळयुक्त पदार्थांवर मोठी कारवाई ; सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभागाची 'धडक'