भरोसा सेलच्या उपयुक्ततेविषयी माहिती देताना महिला सुरक्षा कक्षाच्या अधिकारी नाशिक Nashik Bharosa Cell : अनेक महिलांना पतीसह सासरकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो; भरोसा सेल मधून अशा अनेक तक्रारदार महिलांना जगण्याचा, पुढे जाण्याचा आणि अडचणींना तोंड देण्याचा भरोसा दिला जातो. पोलीस विभागाच्या भरोसा सेल मार्फत पती-पत्नीचं समुपदेशन करून 87 महिला पुन्हा नांदण्यास गेल्या आहेत. (Husband torture wife)
87 महिलांचा संसार झाला पूर्ववत :नाशिकच्या महिला सुरक्षा विभागाच्या भरोसा सेलमध्ये मागील दहा महिन्यात 794 अर्ज दाखल झालेत. त्यातील 87 महिला पुन्हा नांदण्यास गेल्या आहेत. 84 महिलांनी न्यायालयात दाद मागितली आहे तर 118 महिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. माहितीप्रमाणे 197 महिला चौकशीकरिता हजर राहत नाहीत. 487 महिलांचे अर्ज निकाली काढण्यात आले तर 307 तक्रार अर्जांवर कक्षात सुनावणी सुरू आहे. यातील काही निवडक केसेसची माहिती घेतली असता महिलांना जिवंतपणे कशा नरकयातना भोगाव्या लागतात हे यातून दिसून येतं.
पत्नीच्या जिवावर उड्या मारणाऱ्या पतीला चाप :पती व्यावसायिक आणि पत्नी शासकीय नोकरीला. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पुरावे पत्नीच्या हाती लागले. यानंतर पतीने सर्व पैसे प्रेयसीवर उडवल्याने तो कर्जबाजारी झाला. पत्नीच्या बोगस सह्या करत तिला जामीनदार केलं. यानंतर बँकेकडून पत्नीला वसुलीचा दगादा सुरू झाला. अखेरीस भरोसा सेलमध्ये झालेल्या समुपदेशातून या महिलेनं दोन्ही मुलांना सोबत घेत वेगळं राहणं पसंत केलं.
पत्नीची पॉर्न फिल्म बनवणारा पती :पत्नीची पॉर्न फिल्म काढून ती विक्री केल्यानंतर मोठी रक्कम मिळेल या विचारात तो होता. या कारणानं त्यानं पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत पॉर्न फिल्म बनवण्यास भाग पाडत तिचा छळ केला. याप्रकरणी पत्नीनं महिला सुरक्षा विभागात धाव घेतली. यावेळी दोघांचं समुपदेशन करण्यात आलं. मात्र, पत्नी फारकत घेण्याच्या मनस्थितीत होती. पण, पतीनं फारकत देण्यास नकार दिला. आताही ती महिला पतीपासून विभक्त राहत आहे.
पीडित पत्नीला वेगळे राहण्याचा दिलासा :उच्चपदस्थ अधिकारी पत्नी आणि दोन 15, 16 वर्षांचे अपत्य एकत्र राहत होते. पती रोज महिलेवर शारीरिक अत्याचार करायचा. पॉर्न फिल्म बघून त्याप्रमाणे महिलेचं शोषण सुरू होतं. या जाचाला कंटाळून महिलेनं भरोसा सेलमध्ये तक्रार दिली. यानंतर भरोसा सेलच्या माध्यमातून ही महिला मुलीसह विभक्त राहू लागली.
सासू आणि मेहुणीचं ब्लॅकमेल :सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यानं सासू आणि विवाहित मेहुणीला ब्लॅकमेल करत दोघींचं शोषण केलं. पत्नीला हे समजल्यानंतर ती विकृत पतीपासून विभक्त झाली आणि मुलांसोबत वेगळी राहत होती. विकृत पतीनं सासू आणि पत्नीच्या बहिणीचे सीसीटीव्हीद्वारे चोरून काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शोषण केलं. यासंदर्भात भरोसा सेलच्या माध्यमातून शहरातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्चशिक्षित पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारणारा नराधम :दोघे नवदाम्पत्य आयटी इंजिनिअरिंग क्षेत्रात पुण्याला जॉब करतात. घरी दोघेच राहतात. अशात विकृत पती, पत्नीला विवस्त्र करून वारंवार लाथा बुक्क्यांनी मारहाण करतो. त्यामुळे पत्नी नाशिकला माहेरी निघून आली. या त्रासाला कंटाळून महिलेनं नाशिकच्या भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पत्नीनं या अत्याचाराविरुध्द आवाज उठवल्यानंतर पती फारकत करण्यास तयार झाला.
त्रासदायक पतीला आणलं वठणीवर :पती-पत्नीचा 21 वर्षांचा सुखी संसार. अपत्य होणार नाही हे गृहीत धरून दोघांचा संसार सुरू होता. अशात पत्नीला कॅन्सर डिटेक्ट झाला. यानंतर मात्र त्या महिलेचं आयुष्य बदललं. पतीनं तिला त्रास देण्यास सुरुवात केली. 45 वर्षीय पत्नीला तू आता निघून जा, मी दुसरं लग्न करेल आणि अपत्य मला पाहिजे आहे, असं सांगून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केला. ही महिला भरोसा सेलमध्ये आल्यानंतर पतीचं समुपदेशन केलं गेलं. यानंतर त्यानं पत्नीला त्रास देणं बंद केलं.
हेही वाचा:
- १५ लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ; वरिष्ठ पोलीस अधिकारी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
- Husband Torture Wife : विदेशात पती करायचा पत्नीचा छळ; भिवंडीत गुन्हा दाखल
- Talaq In Apartment Lift : हुंड्यासाठी पत्नीचा छळ; अपार्टमेंटच्या लिफ्टमध्येच दिला तलाक, पतीवर गुन्हा दाखल