नाशिक/अहमदनगर Nashik anti corruption : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधीक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर आल्यानंतर सगळ्याच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांची धडक कारवाई करण्याची पद्धत तसंच कुणाचीही तमा न बाळगता कर्तव्यात कसून न करण्याचा बाणा असल्यानं त्यांचा दरारा पूर्वीपासून आहे. आता त्यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या अँटी करप्शन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकानं अहमदनगर एमआयडीसीचे उपअभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन विभागीय अभियंता गणेश वाघ यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
शर्मिष्ठा वालावलकर यांची धडाकेबाज कारवाई - अहमदनगर मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकानं तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांच्यासह तत्कालीन सहाय्यक उपअभियंता गणेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री उशिरा लाच घेताना अटक -महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 1000 mm व्यासाचे पाईप टाकण्याचं काम केलं होतं. या कामाचं तब्बल 2 कोटी रुपये बिल झालं होतं. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचं बिल आउटवर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताची स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे.