नाशिक- 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही केवळ मोहीम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आपले कुटुंब, गाव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
मुख्मंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांच्या बैठकीत संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे, सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरुपाची जनजागृती आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, गाव, जिल्हा व राज्यासाठी आरोग्यासाठी जे जे काही आवश्यक आणि गरजेचे आहे, ते ते करावे लागणार आहे.
आपण प्रतिबंधात्मक उपायांसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या स्वत:सोबत, कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणाऱ्या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, येणारी आपत्ती व लॉकडाऊन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
राज्यात नाशिकचा मृत्यूदर सर्वात कमी- पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ३ हजारने कमी झाली असून मृत्यूदर राज्यात सर्वात कमी म्हणजे, १.६ इतका आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास १० असताना, तो नाशिक जिल्ह्याचा एकास ३० इतका आहे. स्वॅब तपासणीतही नाशिकची कामगिरी अत्यंत वेगवान असून औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्यांचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात २४ ते २८ मे.टन इतका ऑक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील मात्र स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज ५५ मे. टन इतकी निर्मिती केली जात आहे. त्यामुळे, आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध आहे, असे पालकमंत्री भुजबळ म्हणाले.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात येत असून, २५ ते ३० ऑक्सिजन बेड प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध करून दिले आहे. आज संपूर्ण नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतून येणारे पेशंट नाशिक शहरात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी आपापली कर्तव्ये अत्यंत जबाबदारीने पार पाडत असून समाजाप्रती ते आपले कुटुंब म्हणूनच जबाबदारीने वागत आहे. असेही पालकमंत्री भुजबळ म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती सादर करताना सांगितले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू होण्यापूर्वीपासून मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील मोहीम सुरू असून त्याच्या परिणामस्वरूप आम्ही जिल्ह्यातील रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आजक्षणाला जिल्ह्याचा मृत्युदर १.६, तर रिकव्हरी दर ८७ इतका आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आम्हाला ७३ लाख इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचायचे आहे. आत्तापर्यंत आम्ही २० लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. जिल्ह्यात त्यासाठी ३ हजार २८९ पथके कार्यरत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून रुग्णसंख्याही कमीकमी होत चालली आहे.
बैठकील नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दीघावकर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-पीक नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करा; नाशकात कृषीमंत्र्यांंचा पाहणी दौरा