मालेगाव -मुंबईच्या साकीनाका परिसरातून पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांसह एका एजंटला अटक केली आहे. यांच्याकडे चौकशी केली असता यातील एजटचे मालेगावचा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या बागलादेशी नागारिकांना आधार कार्ड काढण्यासाठी मालेगावचे एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख यांचे लेटरहेड वापरल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित एजंट बांगला देशी नागरिकांना आधारकार्ड व पासपोर्ट बनवून देत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या एजटकडे चौकशी करून झडती घेतली असता, त्याच्याकडे देखील बांगलादेशी नागरिकाचा एक भारतीय पासपोर्ट मिळाला. सध्या पोलिसांकडून एजंट लोकांना आधार कार्ड बनवण्यासाठी कोण मदत करत आहे याचादेखील शोध घेतला जात आहे.
या बांग्लादेशींनी स्थानिक पातळीवरील कागदपत्रे बनवण्याकरता दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर केला होता, यामध्ये आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खालीख आणि आमदार शेख असिफ शेख रशीद यांची नावे आहेत. याबाबत एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयातून आधार कार्डसाठी पत्र दिले जात असताना संबंधित नागरिकांची कागदपत्रे तपासली जातात. त्याच्या नोंदीही ठेवल्या जातात. त्यामुळे या प्रकरणात माझ्या नावाने जे पत्र सापडले आहे त्याची तपासणी केली पाहिजे. जे लोक बोगस पासपोर्ट, आधार कार्ड तयार करू शकतात ते बोगस लेटर हेड ही बनू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली.
मालेगावचे एमआयएम आमदार आणि काँग्रेसचे माजी आमदार तर काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनीही असाच दावा केला आहे. माझ्या कार्यालयातून शिफारस पत्र देताना नागरिकांची कागदपत्रे तपासली जातात. मालेगावात बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान ओळखपत्रे बनवणारी टोळी कार्यरत असल्याची मी वेळोवळी तक्रार केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. मी पोलीस आणि संबंधित यंत्रणांना सर्व मदत करण्यास तयार असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले.