महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेळेवर उपचार घेतले म्हणून म्यूकरमायकोसिसवर मात केली; नाशकातील महिलेचा अनुभव - mucormycosis cure patients nashik

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली. अनेक कुटुंब उध्वस्त झाली. मात्र, कोरोनातून बाहेर पडलेल्या मधुमेह रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 200 हुन अधिक म्यूकरमायकोसिस पीडित रुग्ण आढळून आले आहेत.

smita shinde
स्मिता शिंदे

By

Published : May 19, 2021, 6:24 PM IST

Updated : May 19, 2021, 8:22 PM IST

नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या व्यक्तींना म्यूकरमायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. अशात वेळेवर उपचार मिळाले नाही तर अनेकांना आपले दात, डोळे गमावण्याची वेळ आली आहे. मात्र, वेळीच या आजराचे निदान होऊन उपचार झाल्यास या आजारावरही मात करता येत असल्याचं शहरातील स्मिता शिंदे यांनी सांगितले. या आजारातून मुक्त झाल्यावर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.

नाशकातील महिलेची म्यूकरमायकोसिसवर मात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली. अनेक कुटुंब उध्वस्त झाली. मात्र, कोरोनातून बाहेर पडलेल्या मधुमेह रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 200हुन अधिक म्यूकरमायकोसिस पीडित रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारात नाकात बुरशी सदृश्य विषाणू तयार होत आहेत. तसेच डोळ्याला, दाताला जखमा होत आहेत. यात वेळेवर उपचार मिळाले नाही तर अनेकांना डोळे गमवावे लागत आहे. या आजाराबाबत जनजागृती व्हावी, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

वेळेवर उपचार केले म्हणून वाचले -

मी कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी आले. आत सर्व ठीक आहे, असे मला वाटले असताना अचानक माझी दाढ दुखायला लागली. मला वाटले की दाताचे दुखणे आहे. माझे आधी दाढीचे रूट कॅनल झाले होते. त्यामुळे दुखत असेल, असे मला वाटले. मात्र, दातावरील गोळ्या घेऊनही बरे वाटले नाही. मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्याकडे आले. त्यांनी लगेच मला रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले. माझ्या नाकाच्या आतील भागास फंगर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांनी लगेच छोटी शस्त्रक्रिया केल्याने पुढील अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया म्यूकरमायकोसिस या आजारातून मुक्त झालेल्या स्मिता शिंदे यांनी दिली आहे. तसेच म्यूकरमायकोसिसचे लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जा, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा -नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त; लग्नसोहळे धार्मिक कार्यक्रमावर घातली होती बंदी

इंजेक्शनच्या किंमती दुप्पटीने वाढल्या -

म्यूकरमायकोसिस आजारावर उपचार करताना इंजेक्शन महत्त्वाचे आहे. सुरुवातीला म्यूकरमायकोसिस आजारावर लागणारे इंजेक्शन 3500 रुपयांना मिळत होते. त्याची किमत आता 7000 रुपये इतकी झाली आहे. त्याचादेखील तुटवडा आहे. गंभीर रुग्णांना 90 ते 100 इंजेक्शन द्यावे लागतात. या आजाराच्या उपचारासाठी जवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च येत आहे. आम्ही पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा केली आहे. इंजेक्शनचा पुरवठा आणि किंमती कशा कमी करता येईल? यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती डॉ. युसूफ पंजाव यांनी दिली.

म्यूकरमायकोसिसचे ( काळी बुरशी) लक्षणे -

कोरोनामुक्त झाल्यानंतर नागरिकांना नाक चोंदणे व कोरडे पडणे, नाकातून तपकिरी, लाल रंगाचा स्त्राव गळणे, डोळ्याभोवती तीव्र डोकेदुखी व सूज येणे, सायनस गालच्या आजूबाजूचा भाग मुख्यतः डोळ्याचा आजूबाजूचा भाग सुजणे, दातदुखी व सौम्य ताप येणे, डोळ्याने कमी दिसणे.

म्यूकरमायकोसिसचे कारणे -

अनियंत्रित मधुमेह, कोरोना उपचार दरम्यान स्टीरोइड अथवा टोसिलोझुमॅक सारख्या औषधाचा अतिरेक वापराचा परिणाम, कृत्रिम श्वासोच्छ्वास मशीन अतिवापर, प्रमाणाबाहेर प्राणवायू वापर, रोग प्रतिकारशक्ती कमी असणे.

काय करावे -

मधुमेह व्यक्तींनी रक्तातील साखरेचे काटेकोर नियंत्रण करावे
कान नाक घसा तज्ज्ञाकडून एकदा आठवड्यानंतर तपासणी करून घेणे
डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉइड् न घेणे
टूथ ब्रश मास्क वरचेवर बदलणे
दिवसातून दोन वेळा बेटाडोनच्या गुळण्या करणे व वैयक्तिक स्वच्छता ठेवणे

काय करू नये -

छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये
घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये
वैद्यकीय सल्याने औषधांचे सेवन करावे

हेही वाचा -नाशिक : रेमडेसिवीरचा काळाबाजार; 63 इंजेक्शन्ससह महिलांच्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला अटक

Last Updated : May 19, 2021, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details