नाशिक MPSC Passed Student :मालेगाव तालुक्यातील अजंग येथील श्रावण गांजे या तरुणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकाव्या लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 'एमपीएससी'तून जलसंपदा विभागातील सहायक अभियंत्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही एका युवकावर मेंढ्या हाकण्याची वेळ आली आहे. 'एमपीएससी' परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तरुण घरदार सोडून वर्षानुवर्षे तयारी करताना आपल्या आजूबाजूला दिसतात. त्या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. अक्षरशः जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय; पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही हा संघर्ष संपत नसल्याचं चित्र आहे.
बेमुदत उपोषणाला बसणार : माझी 'एमपीएससी' अभियांत्रिकी सेवा 2020 अंतर्गत सहाय्यक अभियंता राजपत्रित अधिकारी म्हणून जलसंपदा विभागात निवड झाली आहे. मात्र, जाहिरात येऊन साडेतीन वर्षे आणि निकाल लागून जवळपास सव्वा वर्षे झाली. तरीसुद्धा आमच्या अद्याप नियुक्त्या झाल्या नाहीत. आमचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हा सर्व टप्पा ऑगस्ट 2022 मध्ये पार पडला होता. त्यानंतर आमच्या नियुक्त्या होणं अपेक्षित होतं. मात्र, तरीसुद्धा आमच्या नियुक्त्या होत नसल्यानं आम्ही 2 ऑक्टोबर पासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला बसणार आहोत, असं श्रावण गांजे यांनी सांगितलं.