नाशिक - शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटनांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची शासनाची जबाबदारी असून या मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांच्या कक्षा अधिक वाढविण्यासाठी संस्थांनी आधुनिक शिक्षणाची कास धरून अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी केले.
नाशिक मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराब देशमुख या सुधारकांच्या विचारांवर शैक्षणिक संस्थांचे जाळे महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. या शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उभं करण्याचे काम कै. वसंतदादा पाटील यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक नेत्यांनी शिक्षणाचे महत्वाचे काम हाती घेऊन शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्यात कर्मवीर भावराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था बनली असून या सामाजिक सेवकांनी उभ्या केलेल्या संस्था गोर गरिबांना शिक्षण देत आहे, महात्मा जोतीराव फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई यांनी आपले योगदान देऊन गोर गरीब मुलांना शिक्षण दिले. पुढील 100 वर्ष काय होणार आहे याबाबत दूरदृष्टी महात्मा फुले यांच्याकडे होती असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटनांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण आग्रह धरण्यात येईल. महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ आणि आपण स्वतः आपल्या विविध प्रश्नाबाबत मार्गी काढण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका, नगरपालिका कायद्याबाबत व सार्वजनिक करप्रणालीबाबत फेरविचार करण्याची आवश्यक आहे. याबाबत नगरविकास मंत्री, अर्थ मंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करत तोडगा काढला जाईल. राज्यसरकरची आर्थिक परिस्थितीत कठीण असून सर्वच संस्थांच्या मागण्या पूर्ण करणे अवघड आहे. यासाठी मागणी करणाऱ्यांनी मागणी करतांना तुटेपर्यंत ताणवू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.