नाशिक- शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहे. या दौर्यात संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका होणार आहेत. राऊत यांच्या दौऱ्यामध्ये काही भाजप नेते हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, हे पक्ष प्रवेश लांबणीवर पडले आहेत.
महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका अन् विकासकामांचे उद्घाटन
खासदार संजय राऊत यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये आगमन झाले आहे. संजय राऊत नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन व भाजपमधील काही नेत्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशासाठी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यात सायंकाळी नाशिकच्या पाथर्डी गौळणे रस्त्याचा लोकार्पण सोहळा तसेच महानगरपालिकेच्या पाथर्डी गाव येथील घरपट्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यांसह विविध प्रभागात जाऊन त्यांनी विकास कामांचे उद्घाटन केले आहे.