नाशिक - युतीच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे मेळाव्यात हजर राहतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते, असे असतानाच ते मेळाव्यात अनुपस्थित राहिले. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार? - harishchandra cavhan
दिंडोरीमधून भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले आहेत.
राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना उमेदवारी देताच राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष असलेल्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना तिकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रचारार्थ पहिलाच मेळावा पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. पवार यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले असून त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली.
चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमचे व त्यांच्या परिवाराचे संबंध हे पूर्वीपासून चांगले आहे. चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मी ही निवडणूक मी लढणार आहे. आज आम्ही त्यांना आमंत्रण दिले होते, पण त्यांना काम असल्याने ते येऊ शकले नसल्याचे भारती पवार यांनी सांगितले.